आत्मपरीक्षण

आत्मपरीक्षण प्रत्येकाने सातत्याने करायला हवे. त्याचा चांगला फायदा होतो. स्वतःच्या प्रत्येक गोष्टीचा त्रयस्थ व्यक्ती म्हणून केलेला अभ्यास अनेक पैलू उलगडतो. अनेकदा आपण अनेक गोष्टी बोलतो. अनेक ध्येय समोर ठेऊन काम करतो. कधी यश तर कधी अपयश मिळते. पण या पलीकडे जाऊन विचार केल्यास आपण केलेल्या कामाचे विश्लेषण अनेक चांगल्या गोष्टी दर्शविते!

भावनेच्या भरात अनेकदा आपण काही कार्ये करतो. ती कार्ये सदैव हिताची होतातच अशी नाहीत. काही तत्वे आपण पाळतो. त्यामुळे होणारा जीवनमानातील बदल आपल्याला जाणवतो. काही निर्णय घेतो त्याचेही बरे वाईट परिणाम जाणवतात. काही गोष्टी करण्याची गरजच नसते. हे सगळे आकलन आपल्याला आत्मपरीक्षण केल्यावर होतात!

आपल्यात सुधारणा करायची असेल तर स्वतःच्या कार्याचे मूल्यमापन आवश्यक असते. कोणताही व्यक्ती जन्मतः हुशार वा कुशल नसतो. पण तो त्याचे ध्येय गाठू शकतो. स्वामी विवेकानंद तर म्हणतात की, कोणतेही एक ध्येय डोळ्यासमोर ठेवा. अन तो विचार स्वतःमध्ये, स्वतःच्या नसांमध्ये इतका भिनवा की ते ध्येय गाठेपर्यंत दुसऱ्या कशाचाच विचार करू नका.

सांगण्याचा मुद्दा इतकाच आपल्याला यश अपयश येण्यामागे अनेक कारणे असतात. त्यांचे मूल्यमान केले तर अडचणी टाळून निर्भेळ यश मिळू शकते! आपले शरीर म्हणजे ते ध्येय गाठण्याचे साधन. ते चांगले असायला हवे. ते निर्दोष असायला हवे. यासाठी आत्मपरीक्षणाइतके चांगले साधन दुसरे नाही.

बदल सृष्टीचा अलिखित अन अपरिवर्तनीय नियम आहे. मग आपणही त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे. अनेकदा प्रयत्न करूनही हवे ते यश मिळत नाही. ध्येय साध्य होत नाही. त्यासाठी परीक्षण आवश्यक असते. त्यातून सुधारणेला वाव मिळतो.

स्वतःतील चुकीच्या गोष्टी कमी करणे म्हणजेच प्रगती करणे. ती प्रगती करण्यासाठी आपल्याला आत्मचिंतनाची गरज असते. ती आपण केल्यास अनेक सकारात्मक बदल घडतील. हाच विजयाचा देखील पाया ठरू शकतो. मी सातत्याने स्वतःतील व स्वतःच्या कार्याचे कार्य झाल्यावर व तत्पूर्वी केलेल्या अंदाजाचे व आलेल्या निकालाचे मूल्यमापन करतो. त्याने आपल्यातील उणीवा तर दूर होतातच सोबत काय करायला नको याचेही आकलन होते.

कोणाचेही मार्गदर्शन व सल्ला न घेता स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर आपण सुधारणा घडवून आणू शकतो. अन हे परिक्षणाने साध्य होते हे माझ्या अनुभवाने तरी शक्य आहे!

2 thoughts on “आत्मपरीक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत