काय करू काय नाही

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते.

दोन दिवसांपूर्वी मी घरी येत असतांना एक मुलगा रस्त्याच्या कडेला मुलीशी काहीतरी बोलतांना पहिला. तो बाईकवर आणि ती घराच्या लोखंडी गेटवर एक हात टाकून उभी होती. तो मुलगा काय म्हटला ते नाही कळल. पण ती मुलगी त्याला म्हणत होती की, आपल्या दोघांच्या बऱ्याच गोष्टी, चालीरीती वेगळ्या आहेत. त्यामुळे शक्य नाही. आता मी हे जवळून जात असतांना ऐकले. त्या मुलीकडे मागे वळून पहिले तर तिला चेहऱ्यावरून काहीच वाटत नव्हते. आणि तो हेल्मेटवीर देखील जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात.

यार, मला नाही हे शक्य. मी नाही विसरू शकत तिला. ती जर अस म्हटली तर.. मी एक ‘नकार’ पचवलेला आहे. त्या मुलीचा होकार असतांना, तीच्या कोणीतरी काका मामाच्या प्रतापामुळे तो नकार झालेला. आता त्या स्थळाबद्दल, म्हणजे त्या मुलीबद्दल ‘एक छान मुलगी’ यापलीकडे काहीच वाटले नव्हते मला. पण ही ‘अप्सरा’ पाहून माझ सगळ् बदललं आहे. आणि ती सोडून कोणीच आपले वाटत नाही. ती सोडून दुसरा विचार येत नाही. मी खूप विचार करतो. पण सगळ् शेवटी फूस. मला खरंच सुचत नाही काहीही. दोन महिन्यांच्या ओळखीवर कसं कोणी आयुष्याचा निर्णय करू शकते. मला तिची माहिती आहे. पण तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे? काहीच नाही. माझा स्वभाव, माझे बोलणे. मी नेमका कसा आहे हे तिला कुठे काय माहिती?

आणि अस डायरेक्ट प्रपोज म्हटल्यावर होकारापेक्षा नकाराचीच भीती वाटते मला. म्हणजे ती करेलच अस नाही. पण अस घडायला खूप चान्सेस आहेत. बर तिच्याशी ओळख वाढवायची इच्छा आहे. पण तिची सीट बदलल्यापासून तेही शक्य नाही. तीचा तो मित्र, आता तीच्या जुन्या जागेवर बसतो. एका भल्या मोठ्या बोक्याच्या फोटोची प्रिंट आउट काढून डेस्कवर लावली आहे. काय कोणाला काय आवडते ना! तिला सांगायला काहीच हरकत नाही. उशीर होण्यापेक्षा हे जास्त चांगल. पण अशा गोष्टीमुळे, तिला मी आवडत असेल तर ती खुश नाहीतर नाराज होईल. तिला नाराज करून मी माझ मन मोकळ करण्यात काहीच फायदा नाही. माझ मन मोकळ झालं की, निदान झोप तरी येईल रात्रीची.

पण तीच्या मानसिक त्रासाचे काय? मी ज्या ज्या वेळी दिसेल तिला, त्या त्या वेळी माझा तो प्रपोज तिला आठवेल. आणि समजा ती काहीच बोलली नाही तर, तीच्या मनात ते राहिलं. आणि तीच्या ‘मस्तीखोर’ स्वभावावर त्याचा परिणाम होईल. म्हणजे मी जेवढे तिला पहिले आहे. त्यावरून ती प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करते अस मला वाटते म्हणून बोललो. कारण, परवा मी तिला पिंग वगैरे नाही केल तर तिने काल गुड मॉर्निंगचा मेल पाठवला. म्हणजे तिला छोटी छोटी गोष्ट देखील ध्यानात येते. मला ती आता जशी आहे ना, अगदी तशी हवी आहे. मी जी अपेक्षा माझ्या जोडीदाराबद्दल केली होती. त्यापेक्षा हजार पटीने छान आहे ही. मी तीच्या समोर नसलो की, तिला माझा विषय इतका आठवणार नाही. आणि जर तीच हवी असेल तरी निदान मला तीच्या जवळपास तरी राहावे लागेल. फक्त आता ते कसं करू हे कळत नाही आहे. मी तिला माझ्या मनातले नक्की सांगेन. पण कसं सांगू हेच कळत नाही आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत