खेळ

काही दिवसांपासून, कंपनीच्या बस मधून उतरलो की घरी येतांना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मैदान आहे. तिथे रोजच मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांचा तो खेळ खूप मजेदार असतो. एका चेंडूला चौकार तर पुढच्याच चेंडूला फलंदाज बाद. संध्याकाळच्या वेळी जिकडे तिकडे चिल्लर कंपनी धुमाकूळ घालत असते. हे सगळ पाहून मला मैदानी खेळ खेळायची इच्छा होणार नाही तर नवलच. परवा जाऊन एक फुटबॉल आणला. आणि दोन दिवसांपासून मी, माझे भाऊ बहिण आणि त्यांचे मित्र असे संध्याकाळी मैदानात फुटबॉल खेळतो. एका वर्षानंतर मैदानावर खेळतो आहे. त्यामुळे आनंद खूप होतो आहे. संगणकावर, मोबाईलवर खेळण्यापेक्षा मैदानात जाऊन खेळण अधिक मजेदार आहे. काही वर्षांपासून कोर्स, नोकरी यात इतका गुरफटून गेलो होतो की खेळण हा प्रकारच बंद झाला होता. आणि इथ आल्यापासून कोणी मित्र वगैरे झालेच नाहीत. आणि जे झाले ते कंपनीमधील त्यामुळे हा खेळाचा विषयच कधी आला नाही.

मला क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बुद्धिबळ खूप आवडतात. क्रिकेट मला टीव्हीवर पाहत बसण्यापेक्षा खेळायला आवडतो. बुद्धिबळ तर काही विचारूच नका. माझा जीव की प्राण आहे. बाकी हॉकी खेळ आवडतो. मला तो धनराज पिल्ले खूप आवडतो. फुटबॉलबद्दल काही बोलण्यापेक्षा खेळूनच पहा. कबड्डी, कुस्तीनंतर शारीरिक व्यायाम होणाऱ्या खेळामधील हा एक खेळ. एक फुटबॉलच्या सामन्यातच तुमचे कपडे घामाने ओले होणार. आणि असे खेळ खेळल्यावर कोणता रोग येतो का ते पहा. वडिलांचा एक नियम होता की, एक तर अभ्यासात खूप पुढे जा नाही तर खेळात. मी दोन्हीतही फार काही पुढे गेलो नाही. पण खेळाच्या बाबतीत मला जास्त इंटरेस्ट. अभ्यास तो फक्त शाळेत असतांनाच. गल्लीत आधी माझ्या मित्रांसोबत आधी क्रिकेटचे सामने व्हायचे. पण खेळापेक्षा जास्त एकमेकांची मस्करी आणि उडवाउडवी. मग त्या सामन्यात हार-जीत विषय रहायाचा बाजूला आणि हास्य सम्राटचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे एखादा संघ दहा ओव्हरमध्ये जीव तोडून शंभर धावा करायच्या. आणि मग दुसरा संघ एकाही धाव करायची नाही. पण विरुध्द संघाला इतका त्रास द्यायचा. की दहा ओव्हरमध्ये त्यांची दमछाक व्हायची. मग ते जिंकून हरल्यासारखे व्हायचे.

लपाछपीमध्ये आम्ही ठरवून एखाद्यावर राज्य आणायचे. आणि मग तो दिवसभर राज्य घेऊन इतका कंटाळून जायचा की शेवटी घरी पळून जायचा. एकदा माझ्यावर देखील असंच केल होत. पण मी पण काही लिंबू टिंबू नव्हतो. राज्य घेऊन मी घरी जायचो. नाश्ता करून यायचो. आणि मग हे सगळे लपून बसलेले कंटाळून मलाच शोधायला यायचे. कोडी घालण्याचा खेळ तर असला मस्त व्हायचा. प्रत्येक जण मनाने कोडे तयार करायचे. आणि सगळे हरले की काही तरी हलकी फुलकी उत्तर देऊन दुसऱ्याची उडवत बसायचे. मी गल्लीत एक कोड टाकल होत ‘एकावर एक किती?’ मग कोणी एकावर एक म्हणजे दोन, कोणी अकरा. अस खूप वेळ झाला की मी त्यांना उत्तर एक अस आहे अस सांगायचो. एकच, कारण मध्ये काही गणिताच चिन्हच नाही अस सांगायचो. पत्ते वगैरे खेळ आम्हा कोणाला आवडतच नसायचे. खेळायचो पण खूप कमी प्रमाणात. त्यापेक्षा ‘व्यापार’ खेळात मज्जा यायची. सगळ्यांनी मिळून बारा कोनी व्यापार बनवला होता. कबड्डीच्या खेळताना कबड्डी कम कुस्तीच व्हायची.

हे अस मागील काही दिवसांपासून खूप आठवायचं आणि मग खेळायची इच्छा वाढत गेली. आणि त्यात ती चिल्लर कंपनी. मग म्हटलं इच्छा पूर्ण करूनच टाकू. काल फुटबॉलच्या सामन्यात माझ्या लहान भावाच्या संघाने माझ्या संघावर ६-२ ने विजय मिळवला. शाळेत असतांना मी धप्पारप्पी, आता काही जण इथ त्याला अप्पारप्पी म्हणतात. त्यातही खूप मजा यायची. खेळ मी तर म्हणतो, बघण्यापेक्षा तो स्वत: खेळण्यामध्ये जास्त मज्जा असते. आणि शरीराचा व्यायाम हा तर बोनसच. जाऊ द्या, एकदा खेळून बघाच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत