ती येते आणि..

दुपारपर्यंत तिची आठवणीने हाल हाल केले. आणि दुपारी ती आल्यावर, त्यापेक्षाही हालाहाल. काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ती काय दिसते यार. दिसल्यावर अजूनच हालत खराब झाली. दुपारी कसबसे तीच्या डेस्कवर जायची हिम्मत करून निघालो. पण शेवटी व्हायचे तेच झाले. डेस्कजवळ गेल्यावर पुढे सरकायची हिम्मतच होईना. तीच्या बाजूच्या दुसऱ्या क्यूबमध्ये बसलेल्या माझ्या ओळखीच्या एपीएमच्या डेस्कवर जाऊन बोललो. नंतर खुपंच बेकार वाटायला लागले. साधे तीच्या डेस्कवर जाऊन मी बोलू शकत नाही. परवा ती माझ्या डेस्कजवळ आलेली. कदाचित माझ्याशी बोलायचे असेल. पण मी तिच्याकडे साधे मान वर करून पाहायची हिम्मत झाली नाही. काय होते यार, ती येते आणि मला घाम फुटतो. घसा, श्वास, हृदयनाथ सगळेच मला सोडून जावू लागतात. याला कसले प्रेम म्हणायचे यार? मी तिला भितो, हेच खरे आहे.

काल घरी येतांना मला माझ्यावर विश्वासच उडून गेलेला. मी मुलींशी बोलू शकत नाही असेच वाटलेलं. गेल्या दोन महिन्यात कोणत्या मुलीशी स्वतःहून बोललो? उत्तर एकही नाही. मग वाटायला लागलेलं, मी काहीच करू शकत नाही. माझे मित्र तर आता तोंडावरच ‘हे कोणाचे सुद्धा काम नाही’ अस बोलू लागले आहेत. रात्री साडे नऊला माझ्या मैत्रिणीला गेल्या सहा महिन्यात प्रथमच स्वतःहून फोन केला. म्हटलं आपण मुलीशी बोलू शकतो की नाही ते पहावे. तीच्या आईने फोन उचलला. मग काय जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि फोन बंद केला तर लगेचंच तीचा फोन. यार मी घर बुक केल्याचा आनंद माझ्यापेक्षा तिलाच झालेला. नंतर नंतर तर ती म्हण आहे ना ‘आ बैल मुझे मार’. तस् झालेलं.

असो, तिला गृहसजावट छान जमते. मला शनिवारी माझ्या घरी येते बोलली. नवीन घर कसं कसं असायला हवं याची आयडिया द्यायला. आणि सोबत दिवाळीची ‘शॉपिंग’चा सुद्धा प्लान करू बोलली. म्हणजे हजार दोन हजारचा फिक्स चुराडा माझा. सोडा, पण मी मुलींशी बोलू शकतो यावर विश्वास तर आला. आज नक्की जाईल तीच्या डेस्कवर आणि काही विषय नसेल तरी दोन पाच मिनिटे का असेना बोलेलच. दीड दोन महिन्यांपासून एकदाही प्रत्यक्ष बोलणे झाले नाही आमचे. जे झाले ते ‘हाय’ च्या पुढे गेलेले नाही. मनाची तयारी करतो आहे. आज नाही अस घाबरणार. आणि हो, ते पे रोल ह्यासाठी की, माझ कंत्राट डिसेंबरला संपते आहे. तसे पुन्हा ते वाढेल. परंतु तिनेही थोडाफार विचार केलेला असेलच ना तीच्या जोडीदाराबद्दल. आता कोणती मुलगी आपला जोडीदार असा कंत्राटदार असावा. किंवा स्वतःहून कमी लेव्हलवर असलेला चालेल? निदान तीच्या पोझिशनच्या जवळपास तरी हवंच ना. आणि दुसरी गोष्ट अशी की, तिचे आई वडील त्यांची मुलगी एखादया चांगल्या घरातच देतील ना! मला माहिती आहे की, हे सगळे मनाचे मनोरे आहेत. वस्तुस्थितीची काहीच जाणीव नाही.

प्रेम पैशाने विकत घेता येत नाही. हे घर किंवा याच कंपनीच्या पे रोल वर यासाठी आहे की, निदान तिच्याशी बोलतांना माझा न्यूनगंड मला निराश करू नये. तीच्या आणि माझ्यात सगळ्याचं बाबतीत खूप फरक आहे. पण मला तीच्या इतकी छान आणि दिसताक्षणी वेडे करून टाकणारी कोणीच नव्हती. आयुष्याच्या अशा वळणावर कोणताही निर्णय तिला आणि मलाही आयुष्य बदलणारा आहे. कदाचित, जेव्हा मी म्हातारा होईल त्यावेळी हा विषय मला बोचू नये म्हणून फक्त. कंपनीच्या पे रोल वर आलो तर तीच्या जवळ राहता येईल. आकडा वाढेल हा बोनस. खर तर ती माझी झाली तर तोच आयुष्याचा खरा बोनस असेल. तीचा होकारही माझ्यासाठी सर्वकाही असेल. स्पष्टच बोलायचे झाल्यास, मला मी काय करतो, बोलतो आहे, हे मलाच काही समजत नाही आहे. बस होते आहे. जे वाटते तेच करतो आहे. ‘चूक की बरोबर’ यासाठी अख्ख आयुष्य पडलं आहे. सध्याला ती सोडून काहीच दुसरे सुचत नाही आहे. पण हे देखील खरे की ती येते आणि.. माझी हवा निघून जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत