बेस्ट फाईव्ह

साहेबांचा फोन वाजला. साहेबांनी डोळे चोळत फोन उचलला. एक मोठी जांभई दिली आणि ‘हल्लो, काही कळत नाही का? ही काय फोन करायची वेळ आहे का? कोण कडमडल?’ तिकडून उत्तर आल ‘माफ करा साहेब, मी तुमचा पीए बोलतो आहे. आता आपली ‘बेस्ट फाईव्ह’ची मिटिंग आहे’. साहेब कडाडले ‘अरे गाढवा, मिटिंग ठेवायची ही वेळ आहे’. तिकडून ‘साहेब दुपारचे चार वाजले आहेत. तुम्हीच तर मागील दोन महिन्यांपूर्वी त्या बोर्डवाल्यांना मिटिंगसाठी वेळ दिली होती’. साहेबांनी कंटाळलेल्या आवाजात ‘अरे झोपू दे रे,  त्यांना सांग साहेब आज खूप बिझी आहेत’. तिकडून ‘बऱ, त्यांना ऑफिस मधून काढतो बाहेर.’ साहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुन्हा साहेबांचा डोळा न लागतो तेच पुन्हा फोन वाजला.

आता मात्र साहेब जाम चिडले रागाच्या भरात फोनवर खेकसले ‘च्यामारी!! झोपेचं खोबर करून टाकल रे फुकनीच्या..’. तिकडून आवाज आला ‘काय हो, मला फुकनीच्या म्हणालात काय? संगमनेरात या मग बघते तुमच्याकडे’. साहेब जाम गडबडले ‘अग, तू..’. फोन आदळल्याचा आवाज झाला. साहेब जाम टेन्शन मध्ये आले. पुन्हा घराचा फोन फिरवला. रिंग वाजली, पण फोन कुणी उचलला नाही. साहेबांनी तीन-चारदा प्रयत्न करून बघितला, पण सार व्यर्थ!  साहेबांनी आपली धोपटी आवरली आणि आपल्या केबिनमधून बाहेर पडले. गाडी काढ म्हणण्यासाठी पीए ला हाक मारणार तेवढ्यात तिथे बोर्डची मंडळी येऊन धडकली. साहेबांनी टाळायचा खूप प्रयत्न केला. तरीही ती मंडळी ऐकेना. शेवटी साहेब काकुळतीला येऊन म्हणाले ‘गृहमंत्री नाराज झाले आहेत’. तरीही ती बोर्ड मंडळी मीटिंग करूनच जा. नाही तर परीक्षा पुढे ढकलावी लागतील. मग शेवटी नाईलाजाने साहेबांनी दहा मिनिटे वेळ दिली. मिटींगला सुरवात झाली.

बोर्डाचे मुख्य अधिकारी म्हणाले ‘त्याच अस आहे की, सीबीएसई वाले पोरं हुशार असतात. आणि ती लोक सुद्धा. म्हणून आम्ही अस ठरवलं आहे की त्यांचीच कॉपी मारायची’. साहेब आपले नुसतेच मान डोलवत होते. पुन्हा बोर्डाचे मुख्य ‘ती लोक बेस्ट फाईव्ह नावाने काही तरी करतात. तसेच्या तसे आम्हाला करायचे आहे’. साहेबांनी नाक पुसले. आणि म्हणाले ‘बेस्ट फाईव्हचा का? आपण बेस्ट टेन करूयात ना’. साहेब बोलतच होते तेवढ्यात पीए साहेबांच्या कानात काही तरी कुजबुजला. साहेब त्याच्याकडे त्रासलेल्या नजरेने म्हणाले ‘त्याला काही काम-धाम नाही. सारखा तो आपला खान बघायला बोलावतो. त्याला सांग मी इथे नाही आहे’. साहेबांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे नजर वळवली तर तो म्हणाला ‘त्याचे काय आहे ना बेस्ट फाईव्ह म्हणजे बेस्ट पाच विषय’, साहेब त्याच वाक्य तोडत बोलले ‘मग काय त्यात?’ अधिकारी उत्तरला ‘आपले सहाच विषय असतात ना’.

साहेब हास्यकल्लोळ करत म्हणाले ‘मग विषय दहा करा. हजार मार्कांची परीक्षा करा. त्यात काय मोठे?’. अधिकारी एकमेकांत चर्चा करू लागले. साहेब क्षणभर गोंधळले आणि अधिकाऱ्यांकडे बघून म्हणाले ‘काही अडचण आहे का?’ अधिकारी म्हणाला ‘साहेब, परीक्षा पुढच्याच आठवड्यात आहेत’. साहेबांनी पुन्हा हास्याची नौकायन केले. अधिकाऱ्यांचे लक्ष त्यांच्या हास्यापेक्षा जास्त त्याचे चमकणारे आणि पुढे आलेले दोन दातांकडे राहिले. साहेब म्हणाले ‘करा हो दहा विषय. काही होत नाही. पोरं करतील अभ्यास! उलट हा क्रांतिकारी निर्णय आहे’. बोर्डाचे सर्वच अधिकारी अवाक झाले. पीए पुढे येऊन साहेबांना म्हणाला ‘नाही, म्हणजे साहेब थोडा विचार करायला हवा ना. आधी देखील असे काही निर्णय चुकले आहे’. साहेब चिडले आणि म्हणाले ‘अरे गाढवा, मला माहिती आहे रे आधी केलेल्या त्या राधाकृष्णच्या “लीला”. पण माझा अजून कोणताच निर्णय चुकलेला नाही. कारण हा माझा पहिलाच निर्णय आहे. चला मी निर्णयाचे खात खोलले म्हणायचे’. आणि साहेब पुन्हा हसले. बोर्डाचे अधिकारी गडबडले. आणि म्हणाले ‘साहेब, त्याची अंमलबजावणी करायला किमान वर्ष लागेल’. साहेबांनी थोडा वेळ विचार केला. आणि म्हणाले ‘ठीक आहे, बेस्ट फाईव्ह तर बेस्ट फाईव्ह’. मीटिंग संपली.

निकालानंतर…

साहेबांचा फोन पुन्हा वाजला. साहेबांनी जांभई देऊन फोन उचलला आणि ‘हेल्लो’ म्हणाले. तिकडून ‘साहेब, आपण केस हरलो’. साहेब आळस देत बोलले ‘मग काय झालं? दहीवीची मुलांना नाही जमलं, आता आपण पहिली ते आठवीच्या मुलांना बेस्ट फाईव्ह लागू करू’. तिकडून ‘आणि दहावीच्या बोर्डाच्या लोकांना काय सांगू?’. ‘त्यांना सांग साहेबांनी कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करून वरच्या न्यायालयात अपील करू’..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत