बोलणारी गुहा

बोलणारी गुहा

बोलणारी गुहा! एका जंगलात एक सिंह रहात होता. एके दिवशी तो शिकारीच्या शोधात तो जंगलात फिरू लागला. पण त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळाली नाही. शेवटी तो थकला.

दिवस संपला. सिंह भुकेलेला पुन्हा आपल्या गुहेकडे परतू लागला. वाटेत त्याला एक गुहा दिसली. त्याने विचार केला, एकदा या गुहेत डोकावून तर पहावं! भक्ष्य मिळाल्यास आजची भूक भागेल.

त्याने आत जाऊन पाहीले तर गुहा रिकामी होती. सिंहाने सुस्कारा सोडला. आता पुन्हा आपल्या गुहेकडे निघावं या विचाराने तो त्या गुहेतून बाहेर पडू लागला.

तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. संध्याकाळ झाली आहे. या गुहेत राहणारा प्राणी परतत असेल. मी याच गुहेत दडी मारून बसतो. म्हणजे मला बसल्या बसल्या आयती शिकार मिळेल. अन माझ पोट भरेल.

विचार मनाशी पक्का करून तो त्याच गुहेत लपून बसला. अन भक्ष्याची वाट पाहू लागला. ती गुहा होती एका कोल्ह्याची. तो कोल्हा थकून आपल्या गुहेजवळ आला. एकाएकी कोल्ह्याची पाऊले थबकली. संध्याकाळच्या धूसर प्रकाशात त्याचे लक्ष जमिनीवरील सिंहाच्या पायाच्या ठशांकडे गेले.

कोल्ह्याने विचार केला! सिंहाच्या पावलांचे ठसे गुहेत तर गेलेले दिसत आहेत. परंतु बाहेर आलेले दिसत नाही! म्हणजे याचा अर्थ सिंह गुहेत बसून माझी पाहतोय तर. जर उशीर झाला असता तर अंधारात मला हे ठसे दिसले नसते.

कोल्ह्याला एक युक्ती सुचली. त्याने मोठ्याने ‘गुहे, ए गुहे’ अशी आरोळी ठोकली. थोडा वेळ थांबून पुन्हा आरोळी दिली. गुहेच्या आत लपलेला सिंह ते ऐकत होता. कोल्हाने पुन्हा आरोळी दिली अन म्हणाला, ‘गुहे तू आज बोलत का नाही? रोज जेंव्हा मी आवाज देतो. तेंव्हा तू दरवेळी मला उत्तर देतेस.’

गुहेत लपलेल्या सिंहाला वाटलं गुहा बहुदा बोलत असावी. आज आपल्या भीतीने ती बोलत नसावी. आपण प्रत्युत्तर देऊ जेणेकरून कोल्हा गुहेत येईल. थोड्या वेळाने कोल्ह्याने पुन्हा आरोळी दिली.

गुहेत लपून बसलेला सिंह दबक्या आवाजात म्हणाला, ‘येरे ये, आजचा दिवस कसा होता?’ कोल्ह्याने लागलीच सिंहाचा आवाज ओळखला. सिंहाला वाटलं आता कोल्हा गुहेत येईल.

तेवढ्यात, बाहेर असलेला कोल्हा म्हणाला, ‘सिंह महाराज बोलणारी गुहा कधी तुम्ही पाहिलीय का?’. सिंह चपापला. पुढे कोल्हा म्हणाला, ‘तुम्ही गुहेतच राहा. मी निघतो!’. हे ऐकताच सिंहाला आपली चूक लक्षात आली.

सिंह लगेचच गुहेबाहेर आला. येऊन पाहतो तर काय कोल्ह्याने धूम ठोकलेली!

तात्पर्य: बुद्धीने मोठ्या संकटावरही मात करता येते!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत