भविष्य

प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पांडित्य भूषण हेमंत आठल्ये यांचा नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून नित्यनियमाने ‘राशी आणि स्वभाव’ या नोंदीवर अनेक जण आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आतुरलेले आहेत. म्हणून आज सोमवार फाल्गुन शुक्लं ९ शके १९३२ रोजीच्या शुभमुहूर्तावर बोलावं म्हणतो. ज्यांचा जन्म १९५० ते १९८५या काळात झालाय त्यांना बालपण उत्तम जाईल. तारुण्यात आणि म्हातारपणी त्यांना त्रास संभवतो. ज्यांचा जन्म १९८५ सालानंतर झाला आहे, त्यांना मनमोहन योगामुळे त्रास संभवतो. देशाचेही जवळपास असेच भविष्य आहे.

गेल्या सात वर्षांपासून मनमोहन योगामुळे सर्वच ठिकाणी भाववाढ, नुकसान आणि धोका संभवतो. जीवित आणि वित्तहानी अमाप प्रमाणात होणार. शत्रूपीडा संभवते. एकूणच आर्थिक आणि सामाजिक संतुलन लयास जाईल. हसन योगामुळे वित्तीय तुट कधीही भरून काढणे शक्यच नाही याचा अंदाज येईल. धान्य आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल. परंतु शरद ऋतूच्या आगमनाने धान्य सडवण्याचे योग्य राहील. वाईन, दारू यांसारखे उद्योगांना मोठी चलती आहे. राहुल योगामुळे वयाची चाळीशी गाठली तरी तारुण्य अजून शिल्लक आहे, अस वातावरण राहील. स्त्री वर्ग सरकारी कागदोपत्री सुधारित आणि विकसित होत असल्याचे चित्र ज्योतिषाचार्य हेमंत आठल्ये यांना वाटते.परंतु सत्यात शीला योगामुळे राजधानीत तरुण मुलींवर होणाऱ्या अत्याचाराने देशाची राजधानी सोबत अत्याचाराचीही राजधानी असा नावलौकीक दिल्ली कमावले. महाराष्ट्रात, आघाडी षडाष्टक असल्याने आदर्श घोटाळे होतील. आणि तरीही लोकात चीड निर्माण होणार नाही.

हे कलियुग आहे, हे सिद्ध करण्यासाठी यूपीएचा जन्म झाल्याचे जाणवेल. कदाचित लोकात ‘कली’चे राज्य काय असते आणि नरकयातना काय असतात याचा याची देही याच डोळा अनुभव येईल. त्यामुळे आपल्याला ‘भविष्य आहे का?’ हा प्रश्न सर्वांच्या मनात नक्कीच निर्माण होईल. आणि त्यामुळेच कदाचित या ज्योतिषी महाशयांना विचारण्याचा मोह आवरता आला नाही. आणि या ज्योतिषीला देखील भविष्य सांगण्याचे ‘भाग्य’. ह्या ज्योतिषीला ज्योतिष हे एक विज्ञान आहे. आकाशातील ग्रह आणि गणित यावर अवलंबून असलेले शास्त्र. यापलीकडे त्यातील काहीही माहिती नाही. आणि जे काही या ज्योतिषीने राशी आणि स्वभाव यात बोललेलं ते ‘निरीक्षण’ होते. जर या हेमंतला भविष्य कळले असते तर.. किती चांगले झाले असते. असो, स्वभावावरून रास ओळखता येते. प्रत्येक राशीचा मूळ स्वभाव कधीही जात नाही. परंतु, मी काही त्यातील तज्ञ नाही. त्यामुळे, घरातील कलह, किंवा भविष्य यांसारख्या गोष्टी सांगण्या इतपत माझी योग्यता नाही.

प्रश्न सर्वांनाच आहेत. आणि उत्तरही सर्वांजवळ आहेत. ते म्हणत ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा तस् आहे. मी काही तत्वज्ञान वगैरे सांगणारा देखील नाही. आयुष्य आणि भविष्य या दोन्ही समतल गोष्टी आहेत. माझे साधे आणि सोपे धोरण आहे. वर्तमान चांगला तर भविष्य चांगले. वर्तमान चांगला ठेवायचा मी सतत प्रयत्न करीत असतो. मनात आणि जीवनात अनेक शंका कुशंका येतात, घडतात. प्रत्येकाचा संदर्भ जीवनाशी आणि भविष्याशी जोडला तर प्रश्नांची गुंतागुंत वाढते. म्हणजे माझ्या गावातील अजूनही लोक स्वप्नात साप किंवा नाग पहिला तर काय करायचे म्हणून वडिलांना विचारायला येतात. आता हा वेगळा विषय आहे. परंतु, मनात येणाऱ्या शंका आणि घडणाऱ्या गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास अनेकदा गडबडतो. आणि त्यामुळेच आपण स्वतःला असह्य जाणवतो. कदाचित यामुळे आपण अध्यात्म किंवा भविष्य याचा आधार घेतो, अस मला वाटत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत