हरकत नाय…

माझे ब्लॉग, लेख चोरी जात आहेत. पण ‘हरकत नाय’. खरच! काही हरकत नाही. ‘सीपी’ करण्यात काहीही हरकत नाही. स्वतःच्या नावाने माझ्या नोंदी प्रसिद्ध केल्यास तरी काही हरकत नाही. नो कॉपी राईट!!! काहीही करा. पण ‘मराठी’ वाढवा. माझे लेख चांगले वाटले असतील तर, त्यांना काहीतरी अर्थ आहे अस वाटत असेल तर बिलकुल ‘नावाचा’ विचार करू नका. त्यातून थोडेफार ‘अर्थार्जन’ होणार असेल किंवा तुमच्या ब्लॉगची हिटिंग वाढणार असेल तर उत्तमच. आता ती गोष्ट वेगळी की, माझा ‘ब्लॉग’ हा त्यासाठी कधीच नव्हता आणि नाही आहे. आणि कधीच तसा नसेल.

माझा ‘ब्लॉग’ हे माझे मत आहे. माझ्या मनातील विचार, एक माध्यम आहे. ज्या माध्यमातून मी माझे मन मोकळे करतो. पण या सर्व गोष्टींपेक्षा सर्वात मोठी गोष्ट आहे ‘मराठी भाषा’. मी विषय बिलकुल बदलत नाही. मराठी भाषा, मराठी माणूस आणि माझा ब्लॉग यांची भेसळ करीत नाही आहे. सगळे विषय एकच तर आहेत. मी एक मराठीच तर आहे. आणि माझे लेख त्यांच्या नावाने प्रसिद्ध करणारे देखील मराठीच तर आहेत. घरातील एखादी वस्तू एखाद्या भावाने घेतली तर काय फरक पडतो? त्यावर त्याचा हक्कच आहे. स्पष्टच बोलायचे झाले तर, अगदी सुरवातीपासून म्हणजे ज्या ज्यावेळी मी परप्रांतीयांचा विषय ब्लॉगवर काढला. परप्रांतीय म्हणजे जे इथे महाराष्ट्रात येऊन, मराठी न बोलता ‘हिंदी’मध्ये बोलणारे. बोलणारे कसले ‘दादागिरी’! त्या त्या वेळी गुजराती, बंगाली ब्लॉगर आणि काही भय्या ब्लॉगर जमातीने त्यांच्या त्यांच्या भाषेत भाषांतरित करून प्रसिद्ध केले. त्यावेळेसही काही वाटले नव्हते. फक्त काय ‘स्पॅम’ची संख्या वाढलेली. कारण, त्यांच्या दृष्टीने मी त्यांचा ‘शत्रू’च!

पण हे तर ‘मराठी’च आहे. मुळात आपले अस्तित्व काय आहे या ‘वेब विश्वात’? मुळात या वेब विश्वात आपली मराठी एखाद्या ‘चांदणी’ प्रमाणे. आपल्या मानाने खूप लहान आणि कमी लोकसंख्या असलेल्या भाषा इथे ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ आहेत. त्यात आपले दीड एक हजार मराठी ब्लॉग. बर त्यात अनेक ब्लॉग हे आजी आजोबा प्रमाणे धापा टाकतात. ह्या जुम्मे ते त्या जुम्मे नोंद. काहीकाही तर ‘क्वॉर्टर्ली’. मग आपली मराठी भाषेतील ब्लॉग संख्या वाढणार कशी? आपले मराठी ब्लॉगचे रोपटे कितीतरी वर्षांपासून अस रोपटेच राहिले आहे. त्यामुळे कसेही, कोणतेही आणि कोणत्याही विषयावर चालेल. अगदी ‘सेक्स’वर असेल तरी चालतील. जे मनात येईल ते! हरकत नाय. प्रश्न फक्त इतकाच आहे की, काहीही करून मराठी वाढायला हवी.

ह्या रोपट्याचा ‘वटरुक्ष’ व्हायलाच हवा. पण हेही खरे की, ‘बांडगुळे’ जास्त दिवस जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे प्रयत्न करा की, निदान थोडे तरी ‘सीपी’ सोडून करायला हवे. आता हे वाक्य माझ्या ब्लॉगच्या ‘बांडगुळ’साठी होता. कृपया राग येऊ नये हीच अपेक्षा. कारण ते जे करीत आहेत ते त्याला ‘चोरी’ पेक्षा ‘बांडगुळ’ हाच शब्द चांगला वाटला, म्हणून वापरतो आहे. आता हे देखील खरे आहे की, मी काही लेखक, विचारवंत नाही. जे मनात येईल ते अगदी जसच्या तस ‘धडक’ बोलून टाकतो. त्यामुळे माझ्या ब्लॉगला दर्जा काय द्यावा हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. आता नाहीतरी इतकी पायरसी वाढली आहे, पण माझी प्रत्येक ‘नोंद’ माझीच आहे. मुळात ‘ब्लॉग’चा मुख्य विषय हा ‘मी’ हाच आहे. ज्या ज्यावेळी जे वाटले ते मी बोललो आहे. आणि जे मी बोललो त्या सर्व गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा मुर्खागिरी असेल, पण ते मला मान्य आहे.

असो, बिनधास्त सीपी करायला हरकत नाय!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत