राष्ट्रभाषा मराठी

अठराव्या शतकात भारताची राष्ट्रभाषा मराठी होती. मराठेशाहीच्या टापा ज्यावेळी अफगाणिस्थानाच्या सीमेवर पडत होत्या त्यावेळी देशाचा सर्व व्यवहार मराठीमधून चालत असे. त्याकाळी नामधारी दिल्ली ही राजधानी मुघलांच्या ताब्यात होती.

तर देशाचा सर्व व्यवहार तत्कालीन मराठेशाहीच्या राजधानी पुण्यातून चालत असे. पुढे ब्रिटिशांनी चाळीस वर्षे मराठ्यांशी लढून देशावर ताबा मिळाला. व देशाची शासकीय व्यवहाराची भाषा इंग्रजी झाली! मुघलांनी फारसी (पर्शियन) वापरलेली. तर मराठेशाहीच्या काळात सर्व शासकीय व्यवहार मराठीतून होत असे. त्यासाठी व्यवहारकोश निर्मितीचे काम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांच्या काळातच पूर्ण झाल्याने मराठी भाषेला सुवर्णकाळ प्राप्त झाला होता.

ब्रिटिशांच्या ताब्यात देश गेल्यावर कारकुनी कामासाठी शाळांची सुरवात देशात झाली. अन मराठीच नव्हे तर सर्व भारतीयांना ब्रिटिशांनी सांगितलेल शिक्षण शिकवले गेले! त्यातून त्यांनी मानसिक गुलामांची अशी एक पिढी निर्माण केली की ती बुद्धिवादी असेल परंतु मानसिकरीत्या ब्रिटिशांची गुलाम असेल. एवढ्या खंडप्राय देशाला सांभाळण्यासाठी त्यांनी ते केले.

दुर्दैवाने ब्रिटीशांनंतर अजूनही तेच शिक्षण पद्धती सुरु राहिल्याने आजही कारकुनी काम करू शकणाऱ्यांची व ब्रिटिशांची मानसिक गुलामी करणारी पिढीचाच सर्वत्र पूर आलेला आहे. त्याचा वापर तत्कालीन हिंदी भाषिक नेत्यांनी स्वतःच्या भाषेसाठी करून घेतला. व राष्ट्रभाषा नसतांनाही गेल्या ७५ वर्षांपासून हिंदी भाषा राष्ट्रभाषा असल्याचा खोटा प्रचार सरकारी खर्चाने केला. दुर्दैवाने आजही हा समज जनमानसात पसरलेला असून त्यामुळे इतर भारतीय भाषा मृत्युमुखी पडत आहेत.

ब्रिटिशांकडून स्वातंत्र्याच्या वेळी भारतातील ७८० हुन अधिक भारतीय भाषा बोलल्या जायच्या. आज त्यातील २२० हुन अधिक भाषा मृत झाल्याचा अहवाल भारत सरकारच्या भाषा विभागाने याआधीच प्रसिद्धीस दिलेला आहे. तसेच हीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास येत्या पन्नास वर्षात तेवढ्याच भाषा मृत होतील असाही अंदाज व्यक्त केलेला आहे.

खरं तर अखंड भारतावर राज्य करणाऱ्या मराठीला पुनः राष्ट्रभाषा म्हणून दर्जा मिळणे आवश्यक होते. परंतु, ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीमुळे गुलाम झालेल्या तत्कालीन मराठी भाषिकांनी याचे स्मरणही झाले नाही! परंतु, तीची पुनर्स्थापना करण्याचे ध्येय ठेवल्यास जगभरातील १५ कोटी मराठी भाषकांना काहीही अशक्य नाही.

दोन हजार वर्षांपासून मनगटाने देशाचे व बुद्धी अन व्यवहार चातुर्याने आर्थिक संपन्नता निर्माण करणाऱ्या मराठी भाषिकांना सगळं शक्य आहे. असे नसते तर इसवीसनाच्या सुरवातीला शकांच्या लक्षावधींच्या फौजेला त्यांनी हरवले नसते! अन ब्रिटिशांना बंगालातून भारतात प्रवेश करणे क्रमप्राप्त झाले नसते. अन मुघलांचे साम्राज्यही नष्ट झाले नसते!

राष्ट्रभाषा मराठी करायची असेल तर सुरवातीला आपण ती राष्ट्रभाषा आहे असं स्वतःला व आपल्या वर्तुळातील इतरांना सांगणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण हे बिंबवणार नाही तोवर पुढचे पाऊल टाकता येणार नाही.

मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र

मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र त्यांच्या लोकसंख्येवर आधारलेले असावे. जगाची लोकसंख्या साधारण आठ अब्जच्या घरात आहे. अन मराठी भाषिकांची संख्या बारा कोटींच्या घरात. याचा अर्थ मराठी भाषिकांची संख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या १.५ टक्के आहे.

जितक्या प्रमाणात मराठी भाषिकांची लोकसंख्या तितकाच त्यांचा प्रभाव असायला हवा. खरं तर प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या मते मराठा/मराठी याची क्षमता दहा हजार पट आहे. त्यावर वेगळी चर्चा केली जाऊ शकते. परंतु, आहे तेवढा जरी प्रभाव टाकला तर अनेक क्षेत्रात मराठीचा शिरकाव होईल. अन पर्यायाने मराठी भाषिकांना याचा फायदा होईल.

मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी काही ध्येयाची आखणी महत्वाची वाटते. म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अन शैक्षणिक अशा काही विभागांमध्ये आपण विभागणी करू शकतो. चला तर एक एक मुद्दा सविस्तरपणे घेऊया.

आर्थिक

मराठी भाषिक सरस्वती अन पूजक असल्याने त्यांचा ओढा कलेकडे सुरवातीपासून अधिक आहे. तरीही आता मराठी भाषिकांनी त्यासोबतच लक्ष्मीची देखील पूजा सुरु करावी. स्पष्ट भाषेत बोलायचे झाल्यास, मराठी भाषिकांनी आर्थिक विषय अधिक गांभीर्याने घेतल्यास ते त्यातही सर्वोच्च स्थान निश्चितच गाठतील. वर्तमानाचा विचार केल्यास फोर्ब्स या नियतकालिकाच्या मते जगभरातील अब्जाधीशांची २०२१ मधील संख्या २७५५ आहे.

याच संख्येचा विचार केल्यास मराठी भाषिक अब्जाधीशांची संख्या किमान ४० तरी असायला हवी. आता किर्लोस्कर, गरवारे, अशोक खाडे, रामदास माने, आदर पुनावाला, धनंजय दातार अशी असंख्य नावे आहेतच. त्यामुळे हा आकडा गाठला गेल्याचीही शक्यता नाकारता येणार नाही! परंतु प्रत्येक मराठी भाषिकाने आपल ध्येय अब्जाधीश होण्याचे ठेवले तर किमान एकही मराठी भाषिक आपल्याला गरीब म्हणून पाहायला मिळणार नाही.

सामाजिक

सामाजिक दृष्टया मराठी भाषिक हा खूप पुढाऱ्याला आहेच. पण आपल्या स्वतःबद्दल न्यूनगंड ठायी बाळगल्याने तितकासा प्रभाव जाणवत नाही. तो न्यूनगंड पूर्वीच्या ब्रिटिशांच्या द्वारे तयार केलेल्या शैक्षणिक धोरणामुळे व दिल्लीशाहीने तोच कित्ता गिरवल्यामुळे निर्माण झालेला आहे. मराठी भाषिकांनी स्वतःबद्दल कमीपणा बाळगण्याचे कोणतेही कारण नसून उलट अभिमान बाळगाव्या असा असंख्य गोष्टी इतिहासात त्याने कोरून ठेवलेल्या आहेत. त्याची उजळणी केल्या हा समाज नक्कीच जगावर फार मोठा प्रभाव पाडू शकतो.

सांस्कृतिक

मराठी भाषिक सांस्कृतिक दृष्टयाही खूप पुढारलेले आहेत. मुळात योध्यांची ही जमात आपले प्रत्येक सण अन उत्सव जयाचे साजरे करते. इतकी अचूक कालगणना आहे की मराठी नवीन वर्षालाच निसर्गाला पालवी फुटते अन गणपतीत हमखास पाऊस कोसळतो. खरं तर याचा अंदाज लावणे आजच्या अत्याधुनिक जगालाही जमलेलं नाही. अशा महान संस्कृतीचा प्रभाव सहजगत्या पडण्याजोगा आहे.

शैक्षणिक

मला वाटते वरील सर्व गोष्टींची गंगोत्री म्हणजे शिक्षण आहे. एकतर आपण मराठी कोण आहोत याची आपल्याला कल्पना नाही. बरं कल्पना आली तर आपल्याला आपला दैदिप्यमान इतिहास माहित नाही. तल्लख अन कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले मराठी भाषिकांना रुद्ररूपी बलाढ्य शारीरिक क्षमताही लाभलेली आहे. ह्याचा विचार केल्यास मराठी भाषिक शिक्षणाच्या जोरावर सर्वकाही साध्य करू शकतात.

मराठी भाषिकांनी मनावर घेतल्यास, जगातील ज्ञानाच्या किमान १.५% ज्ञान मराठीत उपलब्ध असेल. जगातील सर्वच क्षेत्रात किमान १.५% टक्के प्रभाव मराठी भाषिकांचा असेल.

मराठीमय महाराष्ट्रासाठी

मराठीमय महाराष्ट्रासाठी अनेक संकल्पना राबवता येऊ शकतात. खरंतर आपल्या साधुसंतांनी म्हटलेलं, हे विश्वची माझे घर! त्यायोगे मराठीमय विश्व हेही शक्य आहे. तूर्तास आपल्या राज्यातील मराठीच्या वापराबाबत बोलूयात! व्यावसायिक भाषा वाढते अन टिकते!

आक्रमणाचे म्हणाल तर गेल्या दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रावर व मराठी संस्कृतीवर आक्रमण होत होतंच आहे. त्यामुळे आधी सगळं छान होत आणि आता ह्रास होतोय असं काही नाही! त्यावेळेस प्रत्यक्षात शत्रू मराठी माणसांचेच गळे चिरायच्या! आता केवळ तो भाषेला मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात मराठी संस्कृतीवर आक्रमणे होत आलेली आहेत व पुढेही होतील!

मुद्दा इतकाच की, मराठी माणसाने मराठी भाषेवर व महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटाची चिंता करू नये! ते होणारच! जर महाराष्ट्र अख्या देशावर हिंदवी स्वराज्याची पताका फडकवू शकतो तर तो मराठी संस्कृती व भाषेचा प्रसार जगभर करून मराठीमय पृथ्वी करू शकतो!

ब्रिटिशांनी ज्यावेळी जगाच्या पृष्ठभागाच्या एक चतुर्थांश भूभागावर स्वामित्व मिळवले त्यावेळी त्यांची लोकसंख्या साधारण ५१ लाखांच्या घरात होती! जर ५१ लाख ब्रिटिश जगाच्या चौथाईवर अधिकार मिळवू शकत असतील! जर ते त्यांची भाषा जागतिक बनवू शकत असतील तर आठ कोटींच्या मराठी संस्कृतीला काय अशक्य? खरतर संख्याबळ आणि ध्येय यांचा काहीच संबंध नाही! तरीही जर आपल्याला शंका असेल तर आपण जगातील कोणत्याही युद्धाचा ताळेबंद करून पाहावा.

इथं तर आपण केवळ मराठीमय महाराष्ट्राची संकल्पना राबवण्याची गोष्ट बोलत आहोत! आज देशातील प्रत्येक राज्यात मराठी भाषिक आहे. इतकंच काय २०० देशांपैकी ७२ हुन अधिक देशामध्ये मराठी भाषिक स्थायिक आहेत. मग भीती कशाची?

मराठीमय महाराष्ट्र करण्यासाठी आधी आपल्याला वस्तुस्थिती पाहावी लागेल! जेणेकरून अमराठी भाषांची आणि मराठीची सद्यस्थिती व ताकद याची जाणीव होईल! अमराठी भाषिक संस्थांमध्ये मराठीचा वापर कसा होईल व तो होणार नसेल तर त्याला मराठी पर्यायी संस्था कशा उभ्या राहतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याखेरीज आपण या लढाईत यशस्वी होणार नाहीत!

लक्षात घ्या हेही युद्धच आहे! अन युद्ध कधीही संपत नसते! भाषिक आक्रमण आर्थिक कारणांमुळे झालेले आहे! त्याच कारणासाठी पूर्वीही युद्धे झालेली! महाराष्ट्र मराठीमय करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकाने हे कधीही विसरता कामा नये!

मराठी वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रात दिशादर्शक व फलकांवर मराठी असावी असा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठी आपण लागणे आवश्यक आहे! कोणीही कुठेही जाऊन राहू शकतो वा व्यवसाय करू शकतो परंतु, त्या भागातील कायदे पाळणे अपेक्षित असते. अमराठी भाषिकांकडून कळत नकळत अनेक कायद्यांचे उल्लंघन होते. तेही आपण लक्षात आणून दिले तर राज्यात मराठीचा प्रसार जोमाने होऊ शकतो!

देशातील राज्यातील एक तृतीयांश लोकसंख्या १३ वर्षांपेक्षा कमी असलेल्यांची आहे. त्यांच्यासाठी मराठीचे सांस्कृतिक वर्ग भरवले तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना व मराठी संस्कृतीला होईल. मराठी संबंधी जनजागृती करण्यासंबंधी विविध स्पर्धा भरवून त्याद्वारे मराठीबाबत व महाराष्ट्राच्या अजेय इतिहासाची माहिती दिली जाऊ शकते.

शासनाची विविध आस्थापनांमध्ये नियमानुसार मराठीचा वापर होतो का नाही हेही पाहणे आवश्यक आहे. त्यानेही अमराठी भाषांचा अकारण वापर थांबेल व मराठीला कायद्यानुसार प्रथम स्थान मिळू शकेल. असे साधे परंतु सोपे पर्याय आपण वापरायला हवेत!

सोबतच आपण आभासी जगताचा योग्य वापर करीत मराठी भाषेसंबंधी अनेक उपक्रम राबवू शकतो. भविष्यात माहिती हे इंधनाची जागा घेईल. त्यावेळी मराठी भाषेमुळे आर्थिक फायदा मराठी भाषिकांना होऊ शकेल! माहिती असणे हे एकप्रकारे शस्त्रसज्ज असण्याप्रमाणे आहे! त्यामुळे मराठी भाषिकांनी ज्ञान मिळवावे! व मराठीत नसलेल्या गोष्टी मराठीत भाषांतरित कराव्यात! त्यानेही महाराष्ट्र मराठी वाढवण्यास मदत होईल!

मराठीमय महाराष्ट्रासाठी मराठीत सर्व सेवा कशा येतील याची चाचपणी करणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक भाषा म्हणून मराठीचाच वापर कसा होईल हेही कटाक्षाने पहिले पाहिजे. अन या दोन्ही गोष्टींसाठी व्यावसायिक मराठी भाषिक असणे वा सेवा पुरावठेदार मराठी असणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी मराठी भाषिकांनाच कशा मिळू शकतील याच्या यंत्रणेची नितांत गरज आहे!!

मराठी भाषा दिन अन मराठी भाषिक

मराठी भाषा दिन जसजसा जवळ येतो तस तसा अनेकांना मराठीचा उमाळा येतो. अन मग मराठी भाषिकांचे मराठीवर कसे प्रेम नाही. मराठी भाषिक कसा अप्पलपोटी अन मराठी शाळांमध्ये कसा आपल्या पाल्याला टाकत नाही वगैरे तत्वज्ञान झोडतील! हे दरवर्षीचे अन एका दिवसापुरते! पुढे हेच तज्ञ वर्षभर गायब असतात!

साधारण एका तपापासून मी मराठीची सेवा करतो आहे! ते करतांना अनेक गोष्टी अन बाबी लक्षात आल्या त्यावर मत मांडावे त्यासाठी हा लेखनप्रपंच! एखाद्या मराठी माणसाला पाकिस्तान अन चीनचे नाव काढले तर तरी तो चिडतो! त्यांना संपवण्याची भाषा करतो! याउलट तुम्ही अमराठी भाषिकाला तोच विषय काढा तो म्हणेल ते जाऊदे! आपलं काम बघ! थोडक्यात, मराठी भाषिक व्यक्ती हा देशभक्त असतो. देशप्रेम त्याच्या ओतप्रोत भरलेलं असतं!

मराठी भाषेची वस्तुस्थिती पाहिली तर मराठी भाषा कमी होत नसून ती वाढत आहे! देशात ती चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. हिंदी भाषेच्या सरकारी आक्रमणाने गेल्या सत्तर वर्षात दोनशे वर्षे वय देखील नसलेली हिंदीचा वारू देशभर अक्षरशः उधळलेला आहे! त्या भाषेखेरीज अन्य कोणतीही भाषा इतक्या वेगाने वाढत नाही! उलट गेल्या सत्तर वर्षात २२० भारतीय भाषा त्यामुळे मृत झालेल्या आहेत!

त्यातल्या त्यात हिंदी खेरीज अन्य भारतीय भाषांचा विचार केल्यास मराठीची चांगली परिस्थिती आहे! इतकी चांगली म्हणावी की आभासी जगात तिने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे! गेल्या काही वर्षातील आपण आकडेवारी चालली तर आपल्या असं स्पष्ट लक्षात येईल की ती वाढत आहे! त्यामुळे मराठी वाचवा असं म्हणण्याऐवजी ती वाढवा असं म्हणले तर वावगं ठरणार नाही!

बरं हे झालं आभासी जगाचं (डिजिटल विश्वाचं) वस्तुस्थितीत काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घ्येण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात साधारण दोन लाख शालेय संस्था आहेत! त्यापैकी सत्तर हजारी संस्था ह्या शासकीय आहेत! आता २००९ सालचे शासकीय परिपत्रक पाहिल्यास आपल्याला संपूर्ण विषय लक्षात येईल! शासनाने ठरवून शासकीय मराठी माध्यमांच्या शाळा बंद पाडण्याचा अफझली विडा उचललेला आहे.

त्यापुढे जाऊन गेल्या फडणवीस सरकारने शाळा बंद पाडण्याचे लक्ष वगैरे ठेवले! मग प्रत्यक्ष बंद करता येत नाही म्हणून संख्या कमी आहे म्हणून वर्ग बंद करणे. नवीन शिक्षणाच्या नियुक्त्या रोखणे. निधी न देणे. शासन व्यवहारात नियमबाह्यपणे इंग्रजीचा सर्रास वापर करणे असे नानाविविध क्ल्युप्त्या केल्या गेल्या! तशी माहिती जुनी आहे परंतु शासनाच्या १३ हजाराहून अधिक वर्गखोल्या निधीअभावी बंद करण्याचा पराक्रम राज्य सरकारने केलेला!

सोबत गेल्या तपापासून मागेल त्या इंग्रजी शाळांना मान्यता अन मराठी माध्यमांच्या शाळांना झुलवत ठेऊन त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा बनवण्यास भाग पाडले गेले! हे आरोप नसून वस्तुस्थिती आहे! अन दुसरीकडून हेच राष्ट्रीय पक्षांचे नेते मराठी भाषिक मराठी माध्यमांमध्ये आपल्या पाल्याला टाकत नाहीत अशी ओरड करतांना दिसतात!

शासकीय मराठी शाळांची दुरावस्था काय नव्याने सांगायची? शिक्षकांची कमतरता आहेच सोबत निधी अभावी इमारतींची दुरावस्था झाली आहे! स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत! छप्पर कधी कोसळेल याचीही शाश्वती नाही! मग ते आपल्या पिल्लांसाठी जीवाचा धोका का पत्कारातील? सांगा ना यात मराठी भाषिक कुठं चुकतो?

बरं आधी संस्कृत म्हणजे देवभाषा म्हणून मराठीला दुय्यम स्थान दिले! अन आता इंग्रजी म्हणजे वाघिणीचे दूध वगैरे म्हणाले! खरं तर ज्यांना महाराष्ट्राच्या कड्या कपाऱ्यात अन दऱ्या खोऱ्यात निर्माण झालेली मराठी संस्कृतीचा अन महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाहीत तेच हीच भाषा बोलतात! इंग्रजी चांगली म्हणजे नोकरी पक्की ह्या दूधखुळ्या प्रचाराने अनेकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये टाकले! परंतु त्याचा फोलपणा लक्षात आल्यावर आपल्या पाल्याला चांगल्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पुन्हा दाखल केले!

सरकारच्या आकडेवारीनुसार पावणे तीन लक्ष पालकांनी इंग्रजीतून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश केलेला आहे! ह्या गोष्टी काय दर्शवतात? मराठी भाषिकांवर पिढ्यानपिढ्या खोट्या प्रचाराने गुंगवून आता त्यालाच दोष देता! बर मराठी माणूस आळशी वगैरे देणारी जमातही हेच उगाळत असते!

गेल्या अडीच हजार वर्षांचा ज्ञात इतिहास चाळला तर आपल्याला असं स्पष्ट लक्षात येईल की मराठी भाषिक हे अजेय आहेत! जिथं देशावर हजार वर्षांची परकीयांची गुलामी सहन करण्याची वेळ आली तिथं महाराष्ट्राने केवळ ४५० वर्षांची गुलामी सहन केली! जेंव्हा अन्य लोक झाडपाला गुंढाळून कंदमुळे शोधात रानावनात भटकत होती त्यावेळी महाराष्ट्र तत्कालीन रोमशी सागरी मार्गाने आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होता!

मराठी भाषिक राज्ये दक्षिणाधिपती बिरुद लावायची! अगदी तीनशे वर्षाहून अधिक मुघलांचे साम्राज्य मराठी भाषिकांनी संपवले! अन आताच्या भारताच्या भूमी इतक्या भूभाग हिंदवी स्वराज्यात आणला! जगातील सर्वाधिक किल्ले/गड अन लेण्या महाराष्ट्रात आहेत! भारताचे नाविक दल देखील मराठी भाषिकांची देणं! आजही गुन्हेगारी अन प्रजननदर सोडल्यास सर्वच क्षेत्रात मराठी भाषिकांचा महाराष्ट्र उर्वरित देशाशी स्पर्धा करतो! अनेक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाची राज्ये महाराष्ट्राच्या निम्मी देखील नाहीत! मग मराठी माणूस कोणत्या क्षेत्रात मागे आहे?

चाळीस वर्षे मराठ्यांशी लढल्यानंतर ब्रिटिशांना भारतावर एकछत्री अंमल करता आला! लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या आधी मराठीचे ह्या देशाचे सम्राट होते! त्या ब्रिटिशांनी हुशारीने मराठी भाषिकांमध्ये न्यूनगंड पसरवले! अन तेच न्यूनगंड आजही काळे इंग्रज पसरवत राहतात! कोणतीही वस्तुस्थिती न पाहता भ्रम पसरवणे हा इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठी देखील एक धोका आहे!

आजचा मराठी भाषिकांचा महाराष्ट्र भारतीय सैन्याला लागणाऱ्या शस्त्रांची निर्मितीत खूप पुढे आहे! सैन्यदलातील एकूण शस्त्रांपैकी २५% शस्त्र ही महाराष्ट्रात बनलेली आहे! भविष्यात हा आकडा ह्याहून अधिक वाढेल! कोरोनाची लस असो वा सुपर कॉम्प्युटर मेड इन महाराष्ट्र आहेत!

गेल्या दशकाच्या जनगणनेनुसार मराठी भाषा चौथ्या स्थावरून तिसऱ्या स्थानावर आली! जगातील ७८+ देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते! काही देशांमध्ये मराठी शाळा आहेत तर काही देशांमध्ये विद्यापीठात मराठी शिकवली जाते! मग मराठी भाषा कुठं कमी होतेय? वा मराठी भाषिक कसा गुन्हेगार ठरतो हेच कळत नाही! माझ्यामते मराठी भाषेचे व मराठी भाषिकांचे भविष्य उज्वल आहे! आज मातृभाषिकांच्या संख्येचा विचार केल्यास जगात सहा हजार भाषांपैकी दहाव्या क्रमांकाची मराठी भाषा आहे! कृत्रिम शासकीय निधीवर न वाढता नैसर्गिक वाढ हीच मराठीची शक्ती आहे!

तरी सर्व एक दिवसाचा मराठीपणा आणणाऱ्या पर्शियन अन खडीबोलीच्या कलमी हिंदी भाषेच्या गुलामांनी तसेच काळ्या ब्रिटिशांनी प्राचीन मराठी भाषेची चिंता करणे सोडावे!

मराठीचा आग्रह कशासाठी?

अनेकांना मराठीचा आग्रह हा राजकारण वा भावनिक आहे असा मोठ्ठा गैरसमज आहे. अन हा गैरसमज बहुतांश मराठी भाषिकांमध्ये आहे! त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच!

खरं तर हा कुणाला दोष द्यावा असा विषय नाही. आम्हाला शाळेत शिक्षकांनी हिंदी राष्ट्रभाषा आहे असं खोटं बिंबवलं! न आम्हाला दक्षिणाधिपती सातवाहन माहिती न शिवरायांनी पन्नास वर्षात उभे केलेले ३५०+ दुर्ग/किल्ले उभे केले हे माहिती! मग ज्यांना आपण कोण हेच माहित नाही त्यांना मराठी विषयी ममत्व असण्याची आशा बाळगले हे चूकच आहे!

तर वस्तुस्थितीवर बोलूयात! मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून ती देशातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगातील सहा हजार भाषांपैकी सर्वाधिक भाषा बोलण्याच्या यादीत दहाव्या क्रमांकावर ती येते.

आता कायद्याची वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेऊ. भारत हे एक संघराज्य आहे. राष्ट्र या युरोपियन संकल्पनेप्रमाणे नसून अमेरिकन पद्धतीच्या संघराज्यीय व्यवस्था आहे. खचितच प्रत्येक राज्याला बरेच अधिकार आहेत! समानता असावी हा त्यामागील हेतू!

प्रत्येक राज्याच्या भाषेला राज्यघटनेनुसार भारतीय भाषा असण्याचा बहुमान प्राप्त आहे. आता आपल्या देशात ७८० भाषा स्वातंत्र्यावेळी होत्या. आता त्यापैकी २२०च्या भाषा स्वर्गवासी झाल्या आहेत. त्यावर नंतर कधीतरी सविस्तर चर्चा करू! मुद्दा इतकाच ह्या भारताला २२ प्रमुख भाषेचा दर्जा आहे. यात मराठी येते!

घटनेने २२ भाषांना प्रमुख भाषा देतांना भेदभाव केलेला नाही. आता तुम्ही म्हणाल, हिंदी राष्ट्रभाषा आहे वगैरे.. तर बाळांनो, देशातील सर्वात मोठा ४२० चा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो जो हे पसरवतो की, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे, त्याची वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशाला राष्ट्रभाषेचा घटनेत कुठेही उल्लेख नाही. केंद्र सरकारला त्याच्या आस्थापनांच्या अंतर्गत कार्यासाठी इंग्रजी व हिंदी भाषा वापरण्याची मुभा आहे. परंतु, याचा अर्थ ती अधिकृत किंवा राष्ट्रभाषा आहे असा होत नाही.

हिंदी अतिरेक्यांनी (अतिरेकीच शब्द योग्य आहे!) हिंदी राष्ट्रभाषा करावी म्हणून प्रयत्न केला. परंतु विरोधातील मतांच्या अधिक संख्येमुळे तिचा पराभव झाला. अन मग अतिरेक्यांनी हिंदी भाषेचं खुळ राज्यघटनेत नमूद करवून केंद्राच्या पैशाने भाषा वाढवण्याचा प्रयत्न करविला! आता आलं लक्षात हिंदी अतिरेकी का म्हणालो ते?

आता मूळ विषयाकडे येवूयात! प्रत्येक राज्याची स्थापना ही भाषिकांच्या व भाषेच्या आधारावर झालेली आहे. ते करत असतांना अनेक अक्षम्य चुका झालेल्या आहे! त्या सुधारणे आवश्यक आहे! पण भाषावार प्रांतरचना करण्यामागील हेतू भाषिक स्वातंत्र्य असावे असा होता!

महाराष्ट्र अधिनियम क्र.५ (महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४) अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला व तिची लिपी देवनागरी लिपी असल्याचे जाहीर करण्यात आले.

मग जर हिंदीसाठी १० राज्ये अन १ केंद्र सरकार मिळालेले आहेत. मग मराठीसाठी फक्त एकुलता एक महाराष्ट्र आहे. अन कायद्यानुसार तिचा अनिवार्य वापर करणे शासनास बाध्य आहे तर महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा देशद्रोह नसून शुद्ध देशभक्ती आहे. याउलट मराठी नाकारणारे कायद्यानुसार देशद्रोही ठरतात!

ठरवा मग कायदा पाळून देशभक्त व्हायचे की देशद्रोही!

वाहनांची मराठी पाटी

वाहनांची मराठी पाटी बेकायदेशीर नाही. मुळात कायदा आपण कधी वाचतच नाही. अगदी बोटावर मोजण्याच्या गोष्टीपलीकडे आपण त्याकडे पाहतही नाही. तिथूनच फसवणुकीला सुरवात होते!

एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मराठी क्रमांक असलेल्या गाडीच्या पाट्यांच्यावर ट्विटरवर सर्रास तक्रारी होतात. मुख्यत्वे ह्या तक्रारी अमराठी भाषिकांकडून केल्या जातात.

खरं तर ह्यात दोष अमराठी भाषिक राज्यातील कायद्याचा आहे. अमराठी राज्यांनी स्वतःचा वाहन कायदा नसल्याने तिथे केंद्रीय मोटार वाहन कायदा लागू होतो.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार (केंद्रीय मोटर वाहनांच्या नियम १९८९ चा नियम ५० आणि ५१) वाहनाची पाटी इंग्रजीत / रोमन लिपीत असणे बंधनकारक आहे. सदर कायदा महाराष्ट्रात लागू होतो का? तर याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे!

महाराष्ट्राचा स्वतःचा असा मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. सदर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात वाहनांच्या पाट्या कशा असाव्यात याबतात वर्णन आहे. परंतु, लिपीचा कोणताही उल्लेख यात नाही.

मध्यंतरी याबाबत राज्य सरकार देवनागरी लिपीतील पाटयांना परवानगी असेल असा बदल करून यातील शंका दूर करणार होते. परंतु सरकारी कारभार आपण जाणत असालच!

त्यामुळे अमराठी लोकांना महाराष्ट्रातील कायदे माहित नसणे गैर नाही. परंतु आपण कायद्याचे ज्ञान घेऊन त्यांना समजावून देणे आवश्यक आहे! यासाठी आपण कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे.

बहुतांश वेळा सोशल मीडियावरील पोलीसांचे खाते देखील सांभाळणारे अमराठी लोकांनी अकारण दंड लावण्याच्या घटना घडल्या आहेत. वेळ आहे जागरूक होण्याची.

कायदे हे आपल्या सुलभतेसाठी आहेत. त्याचा शस्त्राप्रमाणे वापर करू द्यायचा नसेल तर पुढाकार घेणे आवश्यक आहे. वाहनांची मराठी पाटी कायद्यानुसार गुन्हा नाही!

मुळात महाराष्ट्रात मराठी राजभाषा अधिनियमानुसार पाट्या ह्या मराठीत असणे आवश्यक आहे. तिथे गाड्यांच्या मराठी पाट्यांना विरोध करणे गैर आहे. गाडी चालकाचा बॅच मराठीत असावा असही नमूद आहे.

यावर कधी कोण विरोध करत नाही. महाराष्ट्रात गाड्यांना देवनागरीतील पाट्यांना विरोध हा बहुतांश अज्ञानातून होतो आहे. याला कायदा समजावणे हाच उपाय आहे!

आपण कायद्याच्या गप्पा मारत आहोत. अन तिकडे स्वतः मोटार वाहन विभाग कायदे तोडत आहे. त्यांच्या वेबसाइटवर त्यांनी सर्व कायदे इंग्रजीत प्रसिद्ध केले आहेत. मुळात हाही कायद्याचा भंग आहे!

मराठीसाठी इंग्रजी बोला

मराठीसाठी इंग्रजी बोला. कदाचित हे आपल्याला हास्यापद वाटेल. परंतु, थोडा विचार केला तर हे आपल्यालाही पटेल.

इंग्रजी बोला म्हटलं की अनेकांची तंतरते! त्या गटात मी देखील मोडतो! हाहा!! मी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला असतांना ज्यांचं इंग्रजी उत्तम नाही अशांना इंग्रजी शिकवण्याचा घाट घालण्यात आला.

आठवड्याभरातच एक ट्रेनर कंपनी सुटल्यानंतर एक पन्नास लोकांच्या गटाला इंग्रजी बोलण्याच्या शिकवण्या घेऊ लागली. मीही त्यात होतो. ट्रेनर कसली कडकलक्ष्मी! पहिल्याच दिवशी यातील किती मराठी माध्यमातून शिकले असा प्रश्न केला!

अपेक्षेप्रमाणे जवळपास सर्वांनीच हात वर केले. त्यावर बाई, ‘तुम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे तुमची इंग्रजी कच्ची आहे’ वगैरे बोलू लागली. अनेकांना ती बाब खटकली! काही जणांनी बोलून देखील दाखवली. मुळात चांगलं इंग्रजी येण्यासाठी तो वर्ग होता.

बाईंनी दुसऱ्या दिवशी, ‘शालान्त शिक्षण घेऊनही तुम्हाला अजूनही इंग्रजी येत नाही. याचा कमीपणा वाटत नाही का?’ वगैरे बोलून भडका उडवून दिला. अपेक्षेप्रमाणे अनेकांनी त्यावर प्रतिवाद केला. खरं तर दोन्हीही बाजूने मते योग्य होती. वाद विकोपाला गेलेला. ट्रेनर बदला म्हणून कंपनीत विषय होऊ लागला.

विनाकारण बाई इंग्रजीच्या नावाखाली मराठी आव्हान देत होते. पुढील दिवशी बाईंनी, मला तुमची इंग्रजी किती चांगल्या बोलू शकता हे पाहायचे आहे म्हणून एक एकाने समोर येऊन बोला म्हणू लागली. कोणीही पुढे जायला तयार होईना. शेवटी मी पुढे जाऊन बोलण्याचे ठरवले!

खरं तर काहीतरी करून दोन दिवसांची उत्तरे द्यायची होती. व चूक देखील दाखवून द्यायची संधी होती. पुढे जाऊन (अगदी घोकंपट्टी झालेले सर्वांचं वाक्य) “हॅलो ऑल” वगैरे केलं.

बाईंनी ‘व्हाट इस सब्जेकट?‘ विचारलं! मी उत्तरलो ‘इंग्लिश इस माय सब्जेक्ट’. बाईंनाच काय कुणालाच कळलं नाही. बाईंनी पुन्हा विचारल्यावर, उत्तरलो ‘इंग्लिश लँगवेज इस माय सब्जेक्ट’!

पुढे काय मग सुरूच झालो ‘आय डोन्ट थिंक इंग्लिश इस ग्लोबल लँगवेज’. बाई मला तोडत म्हणाल्या ‘व्हाय’! मी उत्तरलो ‘इफ यु गो इन चायना, फ्रांस, जपान, जर्मनी ऑर इन युरोपिअन कंट्रीज. दे हॅव देअर ओन लँग्वेजेस’. एकच हास्यकल्लोळ माजला!

पुढे ‘आय वॉन्ट तो लर्न इंग्लिश ओन्ली फॉर ऑफिशिअल पर्पझ. इफ आय गो इन मार्केट ऑर इन बस. अँड इफ आय स्पीक इन इंग्लिश दे विल नॉट अंडरस्टँड‘! मग काय दोन दिवसाचा वचपा निघालेला. बाई चार वाक्यातच शब्दामागील गर्भित अर्थ समजून गेल्या. अन मराठीवरून चाललेला तो वाद कायमचा निकाली निघाला!

तेंव्हापासून एक लक्षात आलं की, काही लोकांना इंग्रजीत सांगितल्यावर ताबडतोप कळते! 🙂 त्यामुळे भीती सोडा! मराठीसाठी इंग्रजी बोला!

मराठीची सक्ती

महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करावी वा न कारवाई यावर सध्याला चर्चा सुरु आहे. काहींच्या मते अल्पसंख्याक शाळांना ती नको आहे. काहींचा तर स्पष्ट विरोध देखील आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की मराठी माणूसच मराठी नको म्हणतो.

Continue reading “मराठीची सक्ती”

मराठी वाढवण्याचे ध्येय आणि आपण

मराठी ची गळचेपी होते. हा अनुभवाचा विषय आहे. काही ठिकाणी जाणून बुजून होत. मी गेल्या काही वर्षातील अनुभव सांगतो. इतरांचा अनुभव वेगळा असेल. त्यामुळेच मते वेगळी असतात. त्यामुळे नाकारण्याचे कारण नाही.

Continue reading “मराठी वाढवण्याचे ध्येय आणि आपण”

मराठी वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी मंडळींमध्ये दोन गट आहेत

https://twitter.com/hemantathalye/status/941939636535902210