तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी

तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी ह्याच हेतूने आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ ही योजना राज्यात लागू केली. ह्या योजनेचा हेतू स्पष्ट होता. तुमचं तुम्ही बघा अन वेळेवर कर मात्र भरा.

खरं तर ह्या योजनेप्रमाणे याआधीच आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी ‘स्वावलंबी भारत’ नावाची योजना आणलेली. म्हणजे सरकार टाळेबंदी खेरीज काहीच करणार नाही. जनतेने आपआपले पाहावे. मेले तरी चालतील पण कर मात्र भरा. गेल्यावर्षी देखील न मनपाने मालमत्ता कर सोडला. न कोणत्या बँकेने कर्जाचे हप्ते सोडले. न राज्य सरकारने कोणता वाढीव कर कमी केला. उलट तीनपट जास्त वीजबिल आकारून जनतेला गोत्यात आणले.

आता विषय माल्या किंवा अंबानींचा असता तर तो आमच्या संघराज्य सरकारने स्वतःहून लक्ष घालून तडीस नेला असता. एका रात्रीत गुजरात मधील सर्व विमानतळे सांभाळण्याचे कंत्राट जसे खेळण्याचे विमान सांभाळायचा देखील अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कंपनीला दिल. पण इथं जनतेचा विषय! त्यांना काय ‘जय श्रीराम म्हणा’ विषय मिटला!

कर भरा. वीजबिल भरा ह्याचे संदेश मात्र विपत्र(ईमेल) अन मोबाईल संदेश (एसएमएस) वेळेवर पाठवून मानसिक छळ मात्र सुरु आहे. कोणतीही सवलत नाही. वारंवार वीज खंडित केली जाते. नियमबाह्यपणे इंग्रजी वापरून मराठी भाषिकांना राज्य सरकार मराठी भाषिकांना खिजवत. मुळात ह्या राज्याचा पाया मराठी भाषा असतांना तीच वापरायचं नाही असं राज्य अन संघराज्य सरकारने ठरवलेलं आहे.

तुमचं कुटुंब, संस्कृती, भाषा, तुमच्या आर्थिक अडचणी, तुमचं राज्य अन एकूणच तुमचे जीवन तुमची जबाबदारीपर्यंत प्रवास येऊन थांबेल अशीच परिस्थती आहे. सरकार केवळ टाळेबंदी करायला अन उरलेल्या वेळेत कर गोळा करण्यासाठी आहे.

टीका करण्याला देखील मर्यादा आहेत. पण सरकार नावाचा राक्षस जनतेचे जीव घेण्यासाठी आसुसलेला आहे. मग विषय आरोग्य यंत्रणेचा असो वा बेरोजगारीचा. मग राज्य असो वा संघराज्य सरकार. दोन्हीही गुन्हेगार आहेत.

सरकार अन जनतेत एक अघोषित करार असतो. सरकारने सुरक्षा, चांगले रस्ते, अखंडित वीजपुरवठा, वस्तूंचा योग्य पुरवठा व योग्य दर अन उत्साही अन उद्योगस्नेही वातावरण देणे आवश्यक असते. अन त्याबदल्यात जनतेने कर भरायचा. इथं जनता असुरक्षित आहे. चांगले सोडा रस्तेच नाहीत. महागाईने सर्वोच्च पातळी गाठलेली आहे. वारंवार विजेचे भारनियमन सुरु असते. उत्साही अन उद्योगस्नेही सोडा इथं घरातून बाहेर पडण्याला बंधने घातलेली आहेत. पण कर मात्र चालू!!

कमाई शून्य अन कर हजार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

राक्षसेंद्र

राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार?

नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले देशाचे राजकीय नेतृत्व भारताला लाभल्याने ह्यापेक्षा वेगळे परिणाम होण्याची शक्यताही नव्हती. देशात राक्षसेंद्र आमच्या राज्यात उद्धवेन्द्र अन उत्तर भारतात योगिंद्र असे महान दिग्गज नेते. नियोजन म्हणजे टाळेबंदी हीच काय ते आमच्या सरकारची बौद्धिक मजल! बरं टीकेचाही तिटकारा यावा इतकी भयाण परिस्थती निर्माण करून ठेवलेली आहे.

राष्ट्रीय लसीकरण शक्य नाही पण आणीबाणीच्या काळात सरकारकडे नवीन दरबार (सेंट्रल व्हिस्टा) बांधायला पैसा आहे. सैन्य आर्थिक अडचणीत आलंय! भाड्याने शस्त्रास्त्रे अन उपकरणे घेऊन देशाची रक्षण करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. पण आम्हाला काय आम्ही दाढी वाढवणार थाळ्या अन ताट बडवणार!

कोरोना स्वतः आलेला नाही! त्याला आमच्या राक्षसेंद्रने नियोजनशून्य कारभाराने आणलाय व त्याने तळ ठोकलाय! सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर काय बोलायचे? मुळात ती भारतात अस्तित्वातच नाही. ती सुधारणे आमच्याच्याने शक्य नाही. अन असती तरी आमच्या सांघिक सरकारने ती विकून टाकली असती किंवा अदानी अंबानीला एका रात्रीत भाड्याने दिली असती.

नोटबंदी वाईट वाटली. त्याहून भयानक टाळेबंदी निघाली. महाभयानक तर नियोजनशून्य सरकारची बौद्धिक दिवाळखोरी वाटत आहे. सगळा दोष जनतेला देऊन काय साध्य होणार? प्राणवायू/ऑक्सिजन संपणे. सैन्याला आर्थिक चणचण निर्माण होणे. पेट्रोल, डिझेल, गॅस अन खाद्यतेलाच्या किमती तर त्यांच्या हातात नाहीत ना!

आज दुपारी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवर एक परकीय देशाची महिला, जगाला कोरोनाची लस पुरवणारा देश स्वतःच्या नागरिकांना पुरवू शकत नाही ही शोकांतिका आहे असं म्हणत होती. काय खोटं आहे? स्वतःच घर आगीने वेढलेलं असतांना बाजूच्या घराची आग विझवण्यासाठी धडपडण्यात कसलं आलंय डोंबल्याच विश्वगुरूपणा? हा तर निव्वळ मूर्खपणा आहे!

मी मान्य करतो ह्यात एकट्या(?) सरकारचा सगळा दोष नाही. पण यश मिळालं तर बोक्यांप्रमाणे भांडणारी ही मनपा/राज्य/सांघिक सरकारे अपयश आल्यावर बिनदिक्तपणे जनतेवर ढकलून मोकळी होतात. हेही चुकीचं आहे.

जगभरात अनेक देशांनी टाळेबंदी केली. पण त्यांनी त्यांच्या नागरिकांना पोसले. प्रत्यक्ष आर्थिक भार उचलला! अमेरिकेचे सरकारने साधे ब्रॉडबँडचे बिल देण्यासाठी भत्ते दिले. इंग्लंडच्या सरकारने पगाराच्या ८०% आर्थिक साहाय्य केले. अन आमच्या राज्य सरकार असो वा सांघिक सरकार इंधन, वीज बिलाच्या किंमती तिप्पट करून जनतेला वेठीस धरले. माल्या सारख्या धनाढ्यांचे कर्ज माफ करणारे सर्वोच्च न्यायालयात प्रामाणिक जनतेला आर्थिक दिलासा देण्याची खोटी देखील वचने देत नाहीत.

हे सगळं सहन होण्यापलीकडचे आहे.

इंटरनेट

इंटरनेट आज जगाच्या जवळपास सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. पण याचा आवाका किती? ह्याचा आकार किती? चला तर जाणून घेऊयात!

इंटरनेटला मराठीत आंतरजाल वा जाळं असं म्हणतात. एक सैन्य उपक्रम म्हणून अमेरिकेत याचा जन्म झाला.


Rossotti ची एक जुनी प्रतिमा, इंटरनेटच्या जन्मस्थळांपैकी एक. 
छायाचित्र:
रॉसॉटी, अल्पाइन इन बीअर गार्डन,

१९६९ मध्ये आर्पानेट नावाचे संगणकांचे जाळे बनले. जेअमेरिकेतील विद्यापीठे, सरकार व संरक्षण कंत्राटदारांशी जोडलेले होते. १९७० मध्ये ६० नोड्सने जोडले.

आताप्रमाणे त्यावेळी संगणकाचा आकार लहान नव्हता. भ्रमणध्वनी/मोबाईल तर विषयच नाही. त्यात जोडणी देखील खर्चिक व अडचणीची बाब होती.

अवकाशातील उपग्रहांचा वापर करून बिनतारी माहिती पाठवण्याचे तंत्रज्ञान पुढे विकसित केले गेलं. पुढे १९७४ साली रॉबर्ट कान आणि विंट सेर्फ दोन संशोधकांनी आयपी यंत्रणेची संकल्पना मांडली.

पुढे याचाच वापर करून १९७६ दोन व्यक्तींमध्ये नेटवर्क बनले. यासाठी इंटरनेटवर्क काँन आणि सेर्फने नवीन प्रोटोकॉल बनवला.

आज जगात पावणे दोन अब्ज वेबसाईट आहे. हा आकडा जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश इतका आहे.

१९७५ साली इमेल सुविधा सुरु झाली. २०१९ मध्ये ३.८ अब्ज लोक ही सुविधा वापरतात. यापैकी गुगलचे १ अब्ज वापरकर्ते आहेत.

१९८४ साली डोमेन सर्व्हर सुरु झाले. आयपी ऍड्रेस लक्षात ठेवण्याची गरज संपली. १९८९ मध्ये इंटरनेटचे तीस हजार वापरकर्ते होते.

१९८९ मध्ये वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना अस्तित्वात आणली. त्याच वर्षात एओएलची निर्मिती झाली. त्याचा फायदा इंटरनेट लोकप्रिय होण्यास झाला.

१९९० मध्ये द वर्ल्ड या डायल-अप इंटरनेट सेवेला सुरुवात झाली. गोफर या शोध प्रणालीची देखील निर्मिती झाली. ती मजकूरदेखील शोधत असे. याच साली एमपीथ्रीला मान्यता मिळाली.

१९९१ मध्ये पहिला वेबकॅमचा म्हणजेच ऑनलाईन कॅमेर्‍याचा केंब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला. याच काळात पहिले वेबपेज बनले.

पुढे १९९३ मध्ये मोझाईक हा पहिला ब्राऊझर उपलब्ध झाला. व सर्वाधिक प्रचलित ब्राऊझर बनला. पुढे अमेरिकेतील व्हाईट हाउस आणि शासकीय वेबसाइट इंटरनेटवर आल्या. व वेबमध्ये प्रथमच .gov आणि .org या दोन नामप्रकारांची निर्मिती झाली.

१९९४ मध्ये मोझाईकच्या ब्राऊझरला नेटस्केप नॅव्हिगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी ब्राऊझर तयार झाला.

१९९५ मध्ये नेटस्केप कंपनीने सुरक्षित (SSL असलेला) ब्राऊझर तयार केला. पुढे इबे व अमेझॉन या वेबसाइटची सुरु झाल्या.

१९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल ही मोफत ईमेल सेवा सुरू झाली. १९९७ मध्ये वेबलॉग या पहिल्या ब्लॉगची निर्मिती केली गेली.

१९९८ मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल शोध यंत्राची वेबसाइट सुरू झाली. याच साली नेटस्केपने सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला.

१९९९ मध्ये सेटी (SETI) हा प्रोग्रॅम इंटरनेटवर आला. जवळपास ३० लाख कॉम्प्युटरना जोडलेला या प्रोग्रॅमचे काम होते परग्रहावरील सजीवांचा शोध घेणे. इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या रेडिओ टेलेस्कोपमध्ये जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सेटीद्वारे केले जात होते.

२००१ मध्ये विकिपीडिया या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३ मध्ये स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज संभाषणाला सुरुवात झाली.

२००३ साली MySpace आणि Linkedin या वेबसाइट सुरू झाल्या आणि सोशल नेटवर्किंगच्या युगाला सुरुवात झाली.

२००४ मध्ये फेसबुक ही सोशल वेबसाइट सुरु झाली. २००५ मध्ये यूट्यूब या चलचित्र मोफत ठेवण्याची सेवा देणारी सुरू झाली. २००६ मध्ये ट्‌विटरने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली.

तर असा आहे आपल्या इंटरनेटचा प्रवास!!

लोकशाही फक्त नावाची

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे?

Continue reading “लोकशाही फक्त नावाची”

सरकार आणि आपण

सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते.

Continue reading “सरकार आणि आपण”

मी स्वतः

एक पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक अभ्यास पारंगत, विद्याभूषण नदीच्या कडेने चालले होते. तेवढ्यात त्यांना एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी वळून पहिले तर, एक मुलगा नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात होता. त्या विभूतींना पाहून तो वाचवण्यासाठी विनंती करू लागला. त्यांनी त्याला पहिले आणि म्हणाले, ‘जर तुला पोहता येत नव्हते, तर मग तू पाण्यात गेलाच कशाला?’. त्या मुलाने चूक मान्य केली आणि पुन्हा वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. परंतु हे महाशय त्याला उपदेशाचे डोसच पाजत बसले.

Continue reading “मी स्वतः”

जय बंदी

बोला, जय बंदी! आजींचा कालचा लाल किल्ल्यावरील तो सोहळा पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आता मला जाम विश्वास बसला आहे की, कायदा कोणीही ‘हातात’ घेऊ शकत नाही. काय ते भाषण आणि काय ते संचलन. आजींचे भाषण मी मन लावून नेहमीच ऐकतो. काय गडकरी साहेब? तुम्ही काय फडतूस विषय घेता. म्हणे तिरंगा फडकवणार लाल चौकात. कळल न! आता पुन्हा असला वेडेपणा करू नका. तस् म्हटलं तर मी तुमच्या पक्षाला कधीच मतदान करीत नाही. परंतु, यावेळी मात्र मुद्दा चुकीचा होता, म्हणून बोलतो आहे. काय गरज होती तिरंगा फडकावयाची? आणि फडकून काय मिळणार होत?

Continue reading “जय बंदी”