मुक्तांगण

मुक्तांगण म्हणजे तरी काय? जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर! परंतु, ह्या ब्लॉग/अनुदिनीमध्ये जसे व्यक्त होता येते असे कुठेच व्यक्त होता येत नाही हे नक्की!

एका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या मनात साधारणतः दिवसाला बारा ते अठरा हजार विचार प्रत्येक दिवसाला येतात. व त्यातील अंशी टक्के विचार हे नकारात्मक असतात. मग असं असतांना शांत राहणे कसे शक्य आहे? अन त्यात माझ्यासारख्या जमदग्नीला ते पाळणेही असह्य!

ह्याच असाह्यतेतून जन्माला आले हे लिखाणाचे वेड! साधारण २००८ सालाचा तो काळ! त्यावेळी मी नुकताच मुंबईत नोकरी निमित्ताने होतो. रोजचा बोरिवली ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास! त्यावेळी प्रत्यक्षात घडणाऱ्या घडामोडी अन वर्तमान पत्रात छापून येणाऱ्या गोष्टींमध्ये भयंकर अंतर! मग मी वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळावर जाऊन प्रतिक्रियांच्या रकान्यात वस्तुस्थिती मांडायचो. पण ती प्रतिक्रिया कधी प्रसिद्धच होत नसायची.

पुढे २००९ मध्ये कामानिमित्त वर्डप्रेस ह्या माहिती व्यवस्थापन प्रणालीशी संबंध आला. अन माझा पहिला वाहिला ब्लॉग/नोंद जन्माला आला! पुढील इतिहास तुम्ही वाचू शकता. परंतु २०१५च्या आधीच त्याच नावीन्य संपलेलं! २०१६ मध्ये ट्विटर या मुक्त(?) व्यासपीठाशी गट्टी जमली अन भराभर वर्ष उलटली अन २०२० मध्ये तर त्याचा भलताच शीण आला. जातीपाती अन पक्षीय भेदाभेदापेक्षा त्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या पूर्वग्रह कारवाईचा त्रास नकोसा झाला!

अन पुन्हा हा मोर्चा ब्लॉगकडे वळला! मध्यंतरीच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक अन लिंक्डइनसारख्या प्रकारावर फेरफटका मारला पण फारसा काही रस त्यात उत्पन्न झाला नाही. प्रत्येकाची मते अन आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यातून माझ्यासारख्या व्यक्तीबाबतीत सांगायचे ठरले तर माझा त्रास सहन करणाऱ्यांचाच मोठेपणा वर्णावा अशी परिस्थिती! हाहा!!

त्यामुळे साधारण एका तपाच्या आभासी जगात ब्लॉग हेच सर्वोत्तम आहे हे नमूद करावेसे वाटते! हवे तसे व्यक्त होता येते अन तुमच्या लिखाणावर तुमचाच मालकी हक्क असतो. उगाच कोणाच्या लहरीपणाचा फटका बसण्याचा संबंध मुळीच नसतो! खरं तर या सर्व समाज माध्यमांवर प्रत्येकजण व्यक्त होण्यासाठी जातो. पण तिथे ते सोडून सगळं काही शक्य आहे. असे माझे अनुभवाअंती ठाम मत झाले आहे!

हवे तसे मुक्तपणे मनाच्या लाटांना बागडू द्यायचे असेल तर नक्कीच स्वतःच्या हक्काचा एक ब्लॉग/अनुदिनी बनवा अन मुक्तपणे संचार करा. इथं ना चाच्यांची भीती न कुणाच्या हद्दीचा वाद! खऱ्या अर्थाने मुक्तांगण! म्हणजे माझ्यासारख्या व्यक्त होणार्याला अन प्रतिक्रियावाद्याला हा जणू स्वर्गच! एकदा प्रयत्न नक्की करून पहा!!

समाज माध्यमांची एकाधिकारशाही

खरं तर समाज माध्यमांविषयी काही बोलावं असं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु, सातत्याने समाजमाध्यमांवर येणारी बंधने बोलायला भाग पाडतात.

साधारण, वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. माझा असाच एक मित्र! साधारण त्याच्याशी आभासी जगातुन झालेल्या संपर्काला आता एक तप झालं असेल. त्यावेळी म्हणजे साधारण २००८-०९ च्या सुमारास, तो अन मी नोंदी/ब्लॉगद्वारे व्यक्त व्हायचो. पुढे ब्लॉग लिहिण्यात फारसा रस राहिला नाही. अन संपर्क तुटला.

पुढे २०१६ मध्ये ट्विटर या समाजमाध्यमाद्वारे पुन्हा संपर्कात आलो. त्याहीवेळी त्याच्याकडून समाज माध्यमांवर येणारी बंधने विषयी माहिती मिळायची. परंतु, तसा अनुभव नसल्याने फारसं गांभीर्य वाटत नसायचे! साधारण दोन वर्षांपूर्वी त्याने कंटाळून पुन्हा ब्लॉग सुरु करायचे ठरवले. अन पुनश्च आमचा संपर्क कमी होत गेला.

त्याचा विषय घेण्यामागे तो त्यावेळी ज्या गोष्टी सांगायचं ते मी मध्यंतरी अनुभवल्या. राजकीय स्वार्थासाठी (खरं तर त्यामागे अर्थकारण दडलंय) एका प्रतिष्ठित समाज माध्यमाने बिनदिक्तपणे कोणतेही कारण न देता परस्पर निलंबित केले. पुढे वर्षभर मी दुसऱ्या खात्यावरून विचार मांडण्याचा प्रयत्न केला परंतु, तिथेही हजारदा संबंधित समाजमाध्यमाकडून अडचणी उभ्या टाकायच्या!

मग मी समाज माध्यम बदलून माझे विचार मांडायला सुरवात केले! तिथेही जाणीव व्हावी इतका त्या समाज माध्यमांचा अंकुश! खरं तर प्रत्येकजण आपले मत मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करीत असतो. परंतु, जर तेच होणार नसेल तर तिथे जाण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो!

एका ठराविक पक्षविशेष पटेल तेच दाखवणे वा त्या खात्यावर अप्रत्यपणे बंधने लादणे खरं तर हा त्या खात्यांचा कमाईचे साधन असू शकेल. परंतु, त्याने एक गोष्ट अधिरेखित होते की समाज माध्यमे एकाधिकारशाही गाजवतात! त्यामुळे पुनश्च हरी ओम करण्याचे योजलेले आहे! पाहुयात हा उत्साह किती काळ टिकतो ते!

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो!

Continue reading “ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!”

सोशल मीडिया आणि व्यवसाय

सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो.

Continue reading “सोशल मीडिया आणि व्यवसाय”

ब्लॉग चा पुनः श्रीगणेशा!

पुनः श्रीगणेशा! बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पुन्हा ब्लॉगकडे वळलो आहे. यावेळी अनेकदा घडले तसे सातत्य तुटणार नाही याची काळजी घेईल. अनेकदा ठरवायचो की ब्लॉग पुन्हा चालू करूयात परंतु कधी वेळेमुळे तर कधी केलेल्या केलेल्या कंटाळामुळे राहून जायचे! अनेक गोष्टी आहेत ज्या बोलायच्या आहेत. अनेक विषय असे आहेत. जे पोहोचावं असं वाटतंय. तपासासाठी पुन्हा ही धडपड करत आहे. मधल्या काळात ट्विटरवर रमलेलो! पण ब्लॉग काही केल्या विसरता येईना!

यावेळी परंतु ठरवून आलेलो आहे. ज्ञान, विज्ञानतंत्रज्ञान आणि हो माझ्या ‘मी‘ ह्यावर तर नक्कीच बोलेन! तूर्तास फार काही पकवत नाही!